नेट परीक्षेच्या निकालात एनटीए चा सावळा गोंधळ !
दिल्ली उच्च न्यायालयाने दिले निर्देश

नवी दिल्ली :
डिसेंबर- जानेवारी दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ( #UGC ) वतीने राष्ट्रीय पात्रता ( #NET ) परीक्षा घेण्यात आली. फेब्रुवारीत जाहिर केलेल्या निकालात मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले असून प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रश्नाचे गूण विद्यार्थ्यांना तातडीने बहाल करण्याचे निर्देश दिले आहेत. तर उर्वरित आक्षेपार्ह प्रश्न निकाली काढण्यासाठी समिती नेमून चार आठवड्यांच्या आत निर्णय घेण्यास एनटीए ला सांगितले आहे.

ही परीक्षा ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ), असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी प्रोग्राम्समध्ये प्रवेश पात्रतेसाठी घेतली जाते. एजन्सीने ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत यूजीसी नेट परीक्षा घेतली, ज्याची तात्पुरती उत्तरपत्रिका १४ जानेवारी रोजी जारी करण्यात आली.
कार्तिकेय कहोल या विद्यार्थ्याने या संदर्भात रिट याचिका दाखल केली होती. या परीक्षेत नऊ प्रश्न आणि दोन प्रश्नांचे भाषांतर चुकीचे होते. ज्याने चार प्रश्न आयडी – (४३२४४९८६०४, ४३२४४९८५३०, ४३२४४९८५४४ आणि ४३२४४९८६००) यांना आव्हान दिले आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. १० फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीत, न्यायालयाने एनटीएला चार दिवसांत उत्तर देण्यास सांगितले.
दुसऱ्या सुनावणीच्या तारखेला (१९ फेब्रुवारी), कहोळच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्यांनी त्यांच्या याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे समिती स्थापन करण्याची आवश्यकता नाही कारण पर्याय स्पष्टपणे समान होते. जर पर्याय समान असतील तर समितीचे मत अनावश्यक होते. कार्तिकेय फक्त दोन गुणांनी कमी होता आणि जर त्याचा एक प्रश्नही बरोबर असता तर तो जेआरएफसाठी पात्र ठरला असता. त्या आधारावर, न्यायाधीशांनी त्याला दोन गुण देण्याचा मार्ग मोकळा केला आणि त्याची याचिका निकाली काढली. त्याच दिवशी, न्यायालयाने एनटीएला इतर विद्यार्थ्यांच्या हस्तक्षेप अर्जांवर चार आठवड्यांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिले.
यायालयाच्या आदेशात असे म्हटले आहे की, “अर्जांना प्रतिवादी क्रमांक १ द्वारे प्रतिनिधित्व मानले जाईल आणि प्रतिवादी क्रमांक १ (एनटीए) या आक्षेपांचे मूल्यांकन करण्यासाठी एक तज्ञ समिती स्थापन करेल. तज्ञ समिती अर्जांची तपासणी करेल, अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेईल आणि त्यानंतर १९ फेब्रुवारी पासून ४ आठवड्यांच्या आत जलदगतीने निकाल देईल. या निकालाबाबत एनटीए कडून समाधान न झाल्यास विद्यार्थ्यांना न्यायालयात पुन्हा येता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
“विद्यार्थ्यांनी इतिहासातील ११ चुकीच्या प्रश्नांसाठी पुरावे देऊनही, अंतिम उत्तरसूची दुरुस्त न करता जारी करण्यात आली. एका प्रश्नात दोन समान उत्तरे होती, तरीही अंतिम सूचीमध्ये फक्त एकच बरोबर मानण्यात आला.” हा विद्यार्थ्यांवर सरळ अन्याय असल्याचे इतिहास विषयाचे प्राध्यापक, युजीसी नेट टेस्टबुक अड्डाचे संचालक अश्वनी त्यागी यांनी म्हटले आहे. हा अन्याय दूर होत नाही, तो पर्यंत आपण लढत राहणार असल्याचे त्यागी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तर हिस्ट्री विथ रोहीत सर चे संचालक रोहित यांनीही एनटीए विरोधात दंड थोपटले आहेत.


