देश -विदेशमहाराष्ट्रमुख्य बातमी

राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, एकाचा मृत्यू; नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढणार?

पुणे: गेल्या काही दिवसांपासून जवळपास नामशेष झालेल्या करोना संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तसेच करोनाचा ओमायक्रॉन EG.5.1 हा नवा व्हेरिएंटही आढळून आला आहे. देशात पहिल्यांदाच या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ संशोधक आणि महाराष्ट्राच्या जिनोम सिक्वेन्सिंगचे संयोजक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात ओमायक्रॉन EG.5.1 व्हेरिएंट सापडला होता. मात्र, त्यानंतर जून आणि जुलैमध्ये या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या लक्षणीय नव्हती. गेल्या दोन महिन्यात राज्यात केवळ XBB.1.16 आणि XBB.2.3 व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत.

राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत राज्यातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या ७० इतकी होती. पण ६ ऑगस्टला नोंदवण्यात आलेल्या करोना रुग्णांची संख्या ११५ इतकी होती. तर सोमवारी नोंदवण्यात आलेल्या सक्रिय करोना रुग्णांची संख्या १०९ इतकी आहे. रुग्णांची संख्या वाढण्यासाठी ओमायक्रॉन EG.5.1 व्हेरिएंट कारणीभूत ठरत असल्याचे समजते. यापूर्वी EG.5.1 व्हेरिएंटमुळे इंग्लंडमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्हेरिएंटमुळे इंग्लंडमधील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती.

ओमायक्रॉनच्या EG.5.1 या व्हेरिएंटचे अद्याप देशभरात फारसे रुग्ण सापडलेले नाहीत. मात्र, रुग्णालयात दाखल होणाऱ्या नव्या करोना रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे. सध्याच्या घडीला मुंबईत करोनाचे सर्वाधिक ४३ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात ३४ आणि ठाण्यात करोनाचे २५ सक्रिय रुग्ण आहेत. तर रायगड, सांगली, सोलापूर, सातारा आणि पालघरमध्ये करोनाचा प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती पाहता करोना रुग्णांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली आहे, असे म्हणता येणार नाही. आम्ही सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक आठवड्याला परिस्थितीला आढावा घेतला जात आहे. जून ते सप्टेंबर या काळात श्वसनाचे विकार असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे रुग्णांची संख्या करोनामुळेच वाढली आहे का, हे तपासले जाईल. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये किंचितशी वाढ नक्कीच झाली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button