महाराष्ट्र

दुचाकी पुलावरून पूर्णा नदीत कोसळली; सहा तासांत दोन अपघात, तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू

शेतातील कामे आटपुन घरी जाताना पूर्णा नदीच्या पुलावरील खड्ड्यातून दुचाकी घसरल्याने एक तरुण पुलावर, तर दुसरा 50 फुट खोल पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना नांदुरा जळगाव जामोद रस्त्यावरील येरळी येथे घडली. तर याच ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या आसलगाव जवळ अशाच प्रकारच्या कठडा नसलेल्या पुलावरून दुचाकी नदीत कोसळल्याने एकजण जागीच ठार झाला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून जळगाव जामोद-बुऱ्हाणपूर मार्गावरील पूर्णा नदीच्या पुलांना संरक्षक कठडा नसल्याने अनेक अपघात घडले आहेत. संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी तशी मागणी देखील केली आहे. मात्र अद्याप या मागणीची पूर्तता न झाल्याने आपघातांची मालिका सुरू असल्याचे चित्र आहे. याच पुलावर संरक्षक कठडा नसल्याने तीन युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला आता तरी कठडे बसावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रविवार, 25 फेब्रुवारीच्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास आपल्या शेतीची कामे आटपून धनंजय मुकुंद (26 रा. येरळी) आणि विलास जुनारे (27, रा.येरळी) हे घरी जाण्यासाठी निघाले होते.

दरम्यान, त्यांची गाडी जळगाव-जामोद हद्दीतील पूर्णा नदीच्या जुन्या पुलावर आली असता या रस्त्यावर असलेला खड्यातून उसळली. त्यांना गाडीचा तोल न सांभाळता आल्याने आणि पूलाला संरक्षण कठडा नसल्याने धनंजय हा पुलावरून थेट नदीतील पाण्यात पडला, तर विलास पुलावरच पडला. यात दोघांनाही जबर मार बसला. ही बाब इतरांना माहिती झाल्याने त्यांनी तत्काळ धाव घेत, धनंजयला नदीपात्रातून बाहेर काढले आणि जवळील नांदुरा येथे दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, धनंजयचा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर विलासला खामगावातील एक खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Advertisements
Advertisements

अशीच एक घटना या अपघताच्या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या आसलगाव जवळ घडली आहे. कठडा नसलेल्या पुलावरून नदीत एक तरुण कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मृत तरुणाचा मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला. मात्र या युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. दुचाकीच्या क्रमांकावरुन पोलीस या युवकाची ओळख पटवण्याचा प्रयत्नात असून पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र फक्त सहा तासांत याच मार्गावर पुलाला संरक्षक कठडा नसल्याने दोन अपघातात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच या पूलांवर तत्काळ सुरक्षा कठडा बांधण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button