परभणी : अंगणवाडीसेविका व मदतनिस यांना दर महिन्याला २६ हजार रुपये मानधन देण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतीस महासंघाच्या वतीने गुरुवार, दि.११ जानेवारी रोजी उपोषण मैदानावर आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी चटणी-भाकर खाऊन आंदोलन करीत उपस्थितांचे तसेच प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचा-यांची पदे वैधानिक असून त्यांना वेतन देण्यासह वेतन, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा देण्यात यावी. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दर महिन्याला २६ हजार रूपये मानधन देण्यात यावे. अंगणवाडीसाठी ५ ते ८ हजार घरभाडे मंजूर करावे आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या वतीने गुरूवारी चटणी- भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका, मदतनिस यांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड, प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्यासह महिला आघाडीच्या आशाताई राठोड, इंदुताई तारे, सुनिता कानडे, छबुताई काळे, सविता पंचागे, विमल रोडगे, संजिवनी लोलगे, शोभा बेंद्रे, कविता देशमुख, छाया सासनिक आदी सहभागी झाल्या होत्या.