देश -विदेश

पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा; शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा

पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील बेळगावी येथील एका शाळेतील हा प्रकार उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याच्या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दुधातून विषबाषा झाल्यामुळे 23 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिक्षण विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरु आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बेळगावी येथील सरकारी प्राथमिक शाळेत गुरुवारी, 11 जानेवारीला सकाळी मृत पाल असलेलं दूध प्यायल्याने सुमारे 23 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी शिक्षण विभागाने तपास सुरू केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच हुक्केरी गटशिक्षण अधिकारी (BEO) प्रभावती पाटील यांनी शाळेला भेट दिली. शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”बेळगावी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सर्व दूध पिणाऱ्या मुलांना संकेश्वर रुग्णालयात दाखल केलं. विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचं मूळ कारण सांगणं टाळलं.” या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा शोध घेतला जाईल अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे..

Advertisements
Advertisements

कर्नाटकातील उल्लागड्डी खानापूर गावातील शाळा संकुलात कन्नड, मराठी आणि उर्दू प्राथमिक शाळा आहेत. या शाळेमध्ये सुमारे 400 विद्यार्थी शिक्षण घेतात. सकाळी 11.30 च्या सुमारास मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना दूध देण्यात आलं. दुधाची सेवा करणाऱ्या एका व्यक्तीला भांड्याच्या तळाशी एक मृत पाल आढळली.

याबाबत त्यांनी तातडीने शिक्षकांना सांगितलं. ही माहिती मिळताच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप दूध प्यायलं नव्हतं, त्यांना दूध पिण्यास मज्जाव करुन त्यांच्याकडून दूध परत घेण्यात आलं. गटशिक्षण अधिकारी प्रभावती पाटील यांनी सांगितलं की, 50 हून अधिक विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थ्यांनी आधीच दूषित दूध प्यायलं होतं आणि त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

बेळगावी गावातील कर्नाटक पब्लिक स्कूलच्या कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांना दुपारी दूध पाजण्यात आलं. त्यापैकी काहींनी उलट्या आणि अस्वस्थतेची तक्रार केली. सुमारे 23 विद्यार्थ्यांना हुक्केरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काही पालकांनी अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केली असून त्याची चौकशी सध्या सुरु आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button