परभणी

परभणी शहरात भक्तोत्सव अ.भा. कला महोत्सवाचे आयोजन

परभणी : भारतीय प्रजासत्ताक दिन व वै. तालमणी पं. भक्तराज ज्ञानोबा भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भक्तोत्सव अ.भा. कला महोत्सवाचे परभणी शहरात आयोजन करण्यात आले आहे. हा कला महोत्सव परभणी शहरातील वसमत रोडवरील श्री कृष्णा गार्डन येथे दि.२६ ते २८ जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रपती पुरस्कार विजेते पखवाज वादक ऋतुराज भक्तराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. भक्तोत्सव अ.भा. कला महोत्सवाची माहिती देण्यासाठी मंगळवार, दि.२३ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष जावळे, पत्रकार धाराजी भुसारे, अ‍ॅड. रमेशराव गोळेगावकर, बालाजी काळे, अभय कदम, प्रसन्न जोशी, रवि देशमुख आदिंची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ऋतुराज भोसले म्हणाले की, तीन दिवशीय भक्तोत्सव अ.भा. कला महोत्सवात शुक्रवार, दि.२६ जानेवारी रोजी राज्यस्तरीय वारकरी संगीत भजन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा दोन गटात होणार असून १ ते १५ वर्ष बालगट व खुला गटात १५ वर्ष व त्यापुढील स्पर्धक भाग घेऊ शकणार आहेत. बाल गटातील विजेत्यासाठी प्रथम ७०००, द्वितीय ५००० तर तृतीय विजेत्याला २००० रूपये पारितोषक देवून गौरविण्यात येणार आहे. खुुला गटातील विजेत्यासाठी प्रथम रूपये ११०००, द्वितीय रूपये ७००० तर उत्तेजनार्थ रूपये ३००० पारितोषक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट तबला/पखवाज वादक व उत्कृष्ट हार्मोनियम वादकास २००० रूपयांचे पारितोषक देवून गौरविण्यात येणार आहे. या दिवशी सायंकाळी ६ ते १० या वेळेत स्थानिक कलावंत सादरीकरण करणार आहेत.

भक्तोत्सवात दुसरे दिवशी शनिवार, दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता पासून आखिल भारतीय शास्त्रीय मृदंग सोलोवादन स्पर्धा १५ वर्ष व त्यापुढील वयोगटासाठी आयोजित केली आहे. यातील प्रथम विजेत्यास रूपये ११०००, द्वितीय ७००० आणि उत्तेजनार्थ रूपये ३००० पारितोषक श्री विठ्ठल डेव्हलपर्स पुणे (श्री नंदकिशोर डोंबे) यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच शास्त्रीय मृदंग सोलोवादन स्पर्धेच्या विजेत्या मृदंग वादकास मृदंग भक्तराज युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय सायंकाळी ६.३० ते १० या वेळेत विविध कार्यक्रम होणार आहेत. यात ऋतुराज भोसले व मनोज सोळंके (हरिद्वार, पुणे) यांच्यात पखवाज जुगलबंदी होणार असून त्यांना लहरा साथ मंगेश जवळेकर देणार आहेत. यानंतर बंगलूर येथील मुरली मोहन गौडा यांचे रूद्रवीणा वादन होणार आहे.

Advertisements
Advertisements

त्यांना पखवाज साथ ऋतुराज भोसले करणार आहेत. तसेच पं. यादवराज फड (पुणे) यांचे शास्त्रीय संगीत भजन होणार असून त्यांना तबला अविनाश पाटील, हार्मोनियम संजय गोगटे, गायन साथ राधाकृष्ण गरड करणार आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. भक्तोत्सवात रविवार, दि.२८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प. पंडित म. क्षीरसागर आळंदी दे. यांचे हरी किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी शहरात होणारा तीन दिवशीय भक्तोत्सव कार्यक्रम उस्ताद राशीद खान, शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे व हिंदी आणि उर्दूचे जेष्ठ शायर मुनव्वर राणा यांना समर्पित असल्याची माहिती ऋतुराज भोसले यांनी यावेळी दिली.

भक्तोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून इच्छूकांनी नंदकिशोर डोंबे (९७६७७६४४४४), बालाजी काळे (९८५०४८१९५६), उध्दव राऊत (८९९९४६४९००) यांच्याशी संपर्क साधावा. या कार्यक्रमाचा सर्व रसिक मंडळीनी लाभ घेण्याचे आवाहन ऋतुराज भोसले व समस्त पं. भक्तराज भोसले स्रेही आणि शिष्यगण यांनी केले आहे. यशस्वितेसाठी वृंदावन कॉलनी मित्र मंडळ, खपाट पिंप्री मित्र मंडळ व ऋतुराज भोसले मित्र परीवार परिश्रम घेत आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button