गंगाखेड येथे युवकांकडून अंधाऱ्या महादेवाची अखंड सेवा
यज्ञभूमीत सेवा समितीचा विशेष गौरव

गंगाखेड :
येथील यज्ञभूमीत श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बहु सोमयागी यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांच्या हस्ते सोमेश्वर सेवा समितीच्या सेवकांचा सत्कार करण्यात आला.
गंगाखेड येथील अती प्राचीन आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सोमेश्वर ( अंधाऱ्या महादेव ) मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात दैनिक श्रृंगार व शयन आरतीची संपूर्ण जबाबदारी शहरातील युवक निःस्वार्थ भावनेने पार पाडत असतात. ठाकूर बाफणा, आनंद सारडा, दुर्गेश ओझा, नवनित सोमाणी, शुभम यशवंतकर ही नवयुवक मंडळी सोमेश्वरांची नित्य सेवा करत असतात. स्वच्छता, नित्य श्रृंगार, आरती असे या सेवेचे स्वरूप आहे.
या सेवा समितीच्या वतीने यज्ञभूमीतील सेवेचे एक दिवसीय यजमानपद स्विकारण्यात आले होते. याचे औचित्य साधत सेलूकर महाराजांच्या हस्ते सेवा समितीचा गौरव करण्यात आला. समितीच्या वतीने ठाकूर बाफणा यांनी सत्कार स्वीकारला.

