जगात जर्मनीताज्या बातम्या

गंगाखेड पालिकेत राजकीय वादाची पहिली ठिणगी !

नगराध्यक्षांचे सहीच्या अधिकारावर निर्माण केले प्रश्नचिन्ह !

गंगाखेड :
राजकीयदृष्ट्या ‘हॉट’ समजल्या जाणाऱ्या गंगाखेडचं राजकारण नेहमीच चर्चेत असतं. आता, विरोधी नगरसेवकांनी ‘बहुमतानं’ केलेल्या एका वेगळ्या मागणीमुळे पालिकेच्या राजकारणात वादाची ठिणगी पडलीय. नगराध्यक्षांच्या  प्रशासकीय संचिकांवरील स्वाक्षरी बाबत नगरसेवकानी कायदेशीर अंमलबजावणीची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केलीय. मुख्याधिकारी याबाबतीत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून पालिकेतील राजकीय संघर्षाची ही नांदी मानली जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सौ. उर्मिला मधुसूदन केंद्रे ह्या नगराध्यक्ष पदावर जनतेतून निवडून आल्या. तर आ. डॉ. रत्नाकर  गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत सेनेचे १५ नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा तर सभागृहात बहुमत मात्र यशवंत सेनेचे अशी स्थिती निर्माण झाली. विकास कामं करायची तर ठरावासाठी बहुमत आवश्यक आणि ठराव पारित झाले तर पुढील प्रक्रियेसाठी अध्यक्ष आवश्यक, अशी परिस्थिती आहे. साप – मुंगूसाचे राजकीय वैर असलेले आ. रत्नाकर गुट्टे आणि माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे हे या परिस्थितीत काय मार्ग काढतात, याची चर्चा सुरू होती.

शहराच्या विकासाच्या अजेंड्याखाली हे दोन नेते एकत्र येतील अशा  चर्चा असतानाच काल यशवंत सेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र दिले. त्यात नगराध्यक्ष अधिकार नसताना काही संचिकांवर सह्या करत असल्याचा आरोप करण्यात आला. नगराध्यक्षांना अशा स्वाक्षऱ्या करण्यापासून थांबवावे, अशी मागणी या सदस्यांनी केली. ही मागणी करत असताना शासनाच्या जुन्या नियमांचे दाखले देण्यात आले आहेत.

मुख्याधिकाऱ्यांनी या पत्रावर ’नियमानुसार अंमलबजावणी करावी’ असा शेरा मारत हे पत्र संबंधित विभागाकडे दिले आहे. आता पुढील कार्यवाहीकडे नगरसेवकांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

नियमानुसार मागणी  – ॲड. अकबर, साळवे

ही मागणी नवीन नाही. संबंधीत संचिका नमुना क्रमांक ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी न घेणे बाबत शासनाने २०१८ मध्ये सुधारणा केलेली आहे. या सुधारणेची अंमलबजावणी गंगाखेड पालिकेत होत नाही. ती केली जावी एवढीच आमची मागणी असल्याचे यशवंत सेनेचे गटनेते ॲड. सय्यद अकबर व उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे यांनी स्पष्ट केले आहे.

हास्यास्पद आणि केविलवाणा प्रकार – ॲड. मिथीलेश केंद्रे

यशवंत सेनेच्या नगरसेवकांनी केलेली मागणी हास्यास्पद आणि केविलवाणी आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या हक्कांवर गदा आणण्याचा हा प्रकार असून या नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता शहर विकासाची कामे करत राहण्याचा मनोदय राष्ट्रवादीचे गटनेते ॲड मिथिलेश केंद्रे यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button