देश -विदेश

लोकसभेत पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न, म्हणाले…

गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये चालू असणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा संसदेत तापला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल ८० दिवसांनी माध्यमांशी बोलताना फक्त ३० सेकंद भूमिका मांडली, या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मोदींनी सभागृहात निवेदन करण्यावर विरोधक ठाम असून सत्ताधारी मंत्री भूमिका मांडण्यावर अडून बसले असताना विरोधकांनी मोदींच्या निवेदनासाठी थेट अविश्वास ठराव आणला आहे. या ठरावावर आज चर्चा होत असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न करण्यात आले आहेत.

राहुल गांधी नव्हे, गोरव गोगोई

अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत बोलणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, ऐनवेळी काँग्रेस खासदार गौरव गोगोई अविश्वास ठरावावर बोलायला उभे राहिल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला. मात्र, अध्यक्ष ओम बिर्लांनी गौरव गोगोईंना बोलण्याची परवानगी दिली.

Advertisements
Advertisements

“नाईलाजाने प्रस्ताव आणला”

“पूर्ण इंडिया अलायन्सचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा आहे. आमचा नाईलाज आहे की आम्हाला हा अविश्वास प्रस्ताव संसदेत आणावा लागला. इथे मुद्दा संख्येचा नव्हता, हा मणिपूरसाठीच्या न्यायासाठीचा मुद्दा होता. इंडिया आघाडीनं मणिपूरसाठी हा प्रस्ताव आणला आहे. मणिपूरचा तरुण वर्ग, मुली, शेतकरी, विद्यार्थी न्याय मागत आहेत”, असं गौरव गोगोई आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.

“मार्टिन ल्यूथर किंगनं म्हटलंय की कुठेही अन्याय असेल, तर तो इतर सर्व ठिकाणी अन्यायाचा धोका होऊ शकतो. इनजस्टिस एनीव्हेअर इज ए थ्रेट टू जस्टिस एव्हरीव्हेअर. त्यामुळे मणिपूर जळतंय तर भारत जळतोय. मणिपूरमध्ये आग लागली आहे तर भारतात आग लागली आहे. त्यामुळे आज आम्ही मणिपूर नाही, भारताचा मुद्दा उपस्थित करत आहोत”, असंही गौरव गोगोई म्हणाले.

“मोदींनी मौन व्रत धारण केलं”

दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन व्रत धारण केल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. “आमची मागणी स्पष्ट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे प्रमुख या नात्याने सभागृहात यावं आणि आपली भूमिका मांडावी. त्याला सर्व पक्षांनी समर्थन द्यावं आणि मणिपूरला संदेश जावा की हे सगळं सभागृह या कठीण प्रसंगी मणिपूरसोबत आहे. पण दुर्दैवाने असं झालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन व्रत धारण केलं. ना लोकसभेत बोलणार, ना राज्यसभेत बोलणार. त्यामुळेच अविश्वास ठराव आणण्याची वेळ आली. त्यांचं मौनव्रत आम्हाला तोडायचं आहे”, असं गौरव गोगोई यावेळी म्हणाले.

विरोधकांचे मोदींना तीन प्रश्न

दरम्यान, विरोधकांनी मोदींना मणिपूरच्या मुद्द्यावरून तीन प्रश्न विचारले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमचे तीन प्रश्न आहेत…

१. पहिला प्रश्न – आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का नाही गेले? राहुल गांधी गेले, इंडिया अलायन्सचे वेगवेगळे पक्ष गेले. गृहमंत्री गेले. गृहराज्यमंत्री गेले. पण देशाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी का नाही गेले?

२. दुसरा प्रश्न – पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरवर बोलण्यासाठी जवळपास ८० दिवस का लागले? जेव्हा ते बोलले, तेव्हाही फक्त ३० सेकंद बोलले. त्यानंतर आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मणिपूरसाठी ना संवेदनशील भावना व्यक्त झाल्या ना शांतीचं आवाहन झालं. मंत्रीमंडळ बोलतंय की आम्ही बोलणार. तुम्ही बोला. तुम्हाला कुणीही अडवलेलं नाही. पण एक पंतप्रधान या नात्याने त्यांच्या शब्दाला जे महत्त्व आहे, ते इतर कुणाच्याही शब्दांना नाही. पंतप्रधान या नात्याने मोदींनी शांतीसाठी पावलं उचलली असती, तर त्यात जी ताकद आहे ती इतर कोणत्या खासदारामध्ये नाही.

३. तिसरा प्रश्न – पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून का नाही काढलं? तुम्हाला गुजरातमध्ये तुमचं राजकारण करायचं होतं तेव्हा तिथे एकदा नाही, दोनदा मुख्यमंत्री बदलले. उत्तराखंडमध्ये निवडणुका आल्या तेव्हा एकदा नव्हे चार वेळा मुख्यमंत्री बदलले. त्रिपुरातही निवडणुकांआधी तुम्ही मुख्यमंत्री बदलले. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही का एवढे आशीर्वाद देत आहात ज्यांनी स्वत: हे मान्य केलं आहे की त्यांच्यामुळे इंटेलिजन्स फेल्युअर झालं..

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button