क्रीडा

भारताच्या सेमीफायनल विजयाचा हिरो बीडचा सचिन धस!

सचिन धस आहे तरी कोण त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

नवी दिल्ली: भारताच्या अंडर-१९ संघाने शानदार कामगिरी करत पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात जेव्हा एखादा संघ १२ षटकांत केवळ ३२ धावांत चार महत्त्वाचे विकेट गमावतो, तेव्हाच चमत्कारानेच विजय मिळवता येतो. सचिन धस (९६) आणि कर्णधार उदय सहारन (८१) यांनी मिळून १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असाच चमत्कार केला. दोघांमधील पाचव्या विकेटसाठी विक्रमी १७१ धावांच्या भागादारीच्या जोरावर भारताला अंतिम फेरी गाठण्यात यश आले.

सामनावीराचा पुरस्कार कर्णधार उदय सहारन याला देण्यात आला असला, तरी भारतीय डावाचा संघर्ष जर तुम्ही बारकाईने पाहिला असेल, तर सचिन धसचे योगदान दुर्लक्ष करून चालणार नाही. सचिन धसच्या आक्रमक फलंदाजी करत त्याने ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तेव्हा कर्णधार उदय सहारन ६० चेंडूत २३ धावांवर खेळत होता. पण हा महाराष्ट्राचा धाकड फलंदाज सचिन धस आहे तरी कोण त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

४ धावांनी हुकले शतक

दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या सेमीफायनल सामन्यात सचिन धसने आपल्या प्रतिस्पर्ध्यांची पार झोपच उडवली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने संघाला अडचणीतून बाहेर काढत महत्त्वपूर्ण खेळी केली. महान सचिन तेंडुलकरसारखा संयम बाळगला. संधी मिळेल तेव्हा एकेरी आणि दुहेरी घेत धावफलक पुढे नेला. जिथे त्याला संधी मिळेल तिथे एकापेक्षा एक कमाल शॉटस खेळण्यात त्याने मागे पुढे पाहिले नाही. १७१ धावांच्या भागीदारीत निम्म्याहून अधिक धावा सचिन धसच्या बॅटमधून आल्या.

Advertisements
Advertisements

क्रीझवर १२१ मिनिटे घालवत त्याने ११ चौकार आणि एक षटकार मारला. सलग दोन चौकारांसह ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने स्पर्धेतील आपले सलग दुसरे शतक झळकावले असते, परंतु स्पर्धेतील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज माफाकाच्या स्लोअर चेंडूने तो झेलबाद झाला आणि संघाची धावसंख्या २०३ धावा असताना ४३व्या षटकात तो बाद झाला.

सचिनच्या नावाचे तेंडुलकरशी कनेक्शन

सचिन धसचे वडील संजय धस, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी, हे महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचे खूप मोठे चाहते आहेत. यामुळेच त्यांनी मुलाचे नाव सचिन ठेवले. सचिन महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२३ मध्ये कोल्हापूर टस्कर्सचा भाग होता. सचिन धसची फलंदाजी पुण्यात खूप प्रसिद्ध आहे. १९ वर्षांखालील एका स्पर्धेत या खेळाडूने इतके षटकार मारले होते की, आयोजकही चक्रावून गेले होते. आयोजकांनी सचिन धसच्या बॅटचीही यानंतर तपासणी केली होती.

स्पर्धेतील पहिल्या ४ सामन्यांमध्ये, त्याने २६*, ३२*, २० आणि १५ धावांचे डाव खेळले. त्याच्या याच खेळींच्या जोरावर भारतीय संघ त्या सामन्यांमध्ये शेवटच्या १० षटकांत मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. सचिनने सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यात नेपाळविरुद्ध ११६ धावांची शानदार खेळी केली होती. आता या सामन्यातही त्याने आपल्या धडाकेबाज फटकेबाजीने आफ्रिकन गोलंदाजांना बॅकफूटवर खिळवून ठेवले.

बीडच्या सुपरस्टारच्या नावामागचं कारण?

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राहणाऱ्या सचिन धसचे वडील संजय धस हे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे मोठे चाहते आहे. यामुळे त्यांनी मुलाचे नाव सचिन ठेवले. वडीलांना क्रिकेट आवडत होते आणि त्यामुळे लहानपणीच ठरवले होते की सचिन क्रिकेटर बनणार. असे स्वतः सचिन धस कर्णधार उदय सहारनशी बोलताना म्हणाला. त्यांचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळने सोशल मीडिया पोस्ट केला आहे.

पैसे उसने घेऊन मुलासाठी खेळपट्टी केली तयार 

सचिन धसचे वडील संजय धस यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना खुलासा केला की, त्यांनी आपल्या मुलाला प्रशिक्षण देण्यासाठी पैसे उधार घेऊन खेळपट्टी तयार केली. मात्र, बीडमध्ये आधीच पाण्याचं संकट आणि त्यात खेळपट्टीला लागणारं अधिकचं पाणी यात खेळपट्टी सुस्थितीत राखण्याचं आव्हान सचिनच्या वडिलांसमोर होतं. पण मुलाला क्रिकेटर बनवण्याची त्यांची इच्छा इतकी दांडगी होती की, त्यांनी यावरही उपाय शोधून काढला. दोन दिवसातून एकदा ते खेळपट्टीसाठी टँकर मागवायचे. संजय धस सचिनच्या यशाचं सर्व श्रेय त्याचे प्रशिक्षक अझहर देतात. अझहर यांनी सचिनला फलंदाज म्हणून घडवण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचं संजय धस यांनी सांगितलं.

19 वर्षांखालील विश्वचषकात सचिन धसच्या मोक्कार धावा 

2024 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सचिन धस हा दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आतापर्यंत त्यानं 6 सामन्यांत 73.50 च्या सरासरीनं 294 धावा केल्या आहेत. भारताचा फलंदाज मुशीर खान पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं 6 सामन्यात 67.60 च्या सरासरीनं 338 धावा केल्या आहेत.

सचिनची आई महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत 

सचिन धस यांची आई सुरेखा धस या महाराष्ट्र पोलिसांत सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आहेत. त्यांच्या काळात त्या कबड्डीपटू होत्या. सचिनचे वडील विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहेत. सचिनची बहीण प्रतीक्षा पुण्यात यूएसपीसी परीक्षेची तयारी करत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button