मुख्य बातमीराजकारण

शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त

मुंबई : गेल्या ६० वर्षांपासून देशाच्या राजकारणात शरद पवार नावाचं घोंघावणारं वादळ आता संसदीय राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सूचकपणे शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली. १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असं सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असं पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मकथेच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन आज झालं. याच भाषणात त्यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. सार्वजनिक जीवनात कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे, असं त्यांनी सांगितलं.

साहेब आम्हाला निर्णय मान्य नाही, पवारांच्या घोषणेवर कार्यकर्त्यांची नाराजी, सभागृहात जोरदार गोंधळ

Advertisements
Advertisements

साहेब आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही, आपण आपला निर्णय मागे घ्या, आम्हाला आपला खूप मोठा आधार वाटतो, अशी भावनिक साद घालत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास ही घोषणाबाजी सुरु होती. शेवटी अजित पवार यांनी माईक हाती घेऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना केली. तोपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी मंचावर शरद पवारांना गराडा घातला होता. राष्ट्रवादीचे एकएक करुन नेते मंडळी पवारांना विनंत्या करत होते. धनंजय मुंडे तर पवारांच्या पायाशी बसून राहिले. शेवटी नेते-कार्यकर्त्यांच्या मताचा रेटा पाहून माझ्या घोषणेवर समिती जो निर्णय घेईन, तो निर्णय पवारसाहेबांना मान्य असेल, असं अजित पवार म्हणाले. तरीही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. साहेबांचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही गावाला जाणार नाही, असं कार्यकर्ते म्हणाले.

पवार काय म्हणाले?

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. सार्वजनिक जीवनातील १ मे, १९६० ते १ मे, २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल.

आपणास माहित आहे कि, माझा अनेक स्वयंसेवी संस्थाच्या कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर (मुंबई), महात्मा गांधी सर्वोदय संघ (उरळी कांचन, पुणे), शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (बारामती), अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (पुणे) ह्या संस्थामधून साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेतात. तसेच मुंबई शहरामध्ये वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारे नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या विविध प्रश्नासंबंधी अभ्यास करणारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करणारी, काही लाख ग्रंथांचे संवर्धन करणारी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्था, पुणे जिल्ह्यातील मांजरी बु. येथील ऊस व साखरकारखानदारी क्षेत्रात संशोधन विस्तार कार्य करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या अनेक संस्थांची मी जबाबदारी सांभाळत आहे व माझे योगदान देत आहे. ह्या कार्यावर यापुढे मी अधिक लक्ष देणार आहे.

सदर समितीत खालीलप्रमाणे सदस्य असावेत.

श्री. प्रफुल्ल पटेल, श्री. सुनील तटकरे, श्री. के.के. शर्मा, श्री. पी.सी. चाको, श्री. अजित पवार, जयंत पाटील, श्रीमती सुप्रिया सुळे, श्री. छगन भुजबळ, श्री. दिलीप वळसे पाटील, श्री. अनील देशमुख, श्री. राजेश टोपे, श्री. जितेंद्र आव्हाड, श्री. हसन मुश्रीफ, श्री. धनंजय मुंडे, श्री. जयदेव गायकवाड तसेच श्री. इतर सदस्य : श्रीमती फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, श्री. धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कु. सोनिया दूहन, अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस आणि अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.

ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्वास व्यक्त करतो.

माझ्या सहकाऱ्यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसात काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल.

‘सततचा प्रवास हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम, सभा समारंभाना येत राहिल. आपणाशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गान्हाणी ऐकण्यासाठी आणि सरकारकडे मांडण्यासाठी माझी पायपीट अविरतपणे चालू राहिल.

जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार त्यामुळे भेटत राहू, धन्यवाद ! जय हिंद, जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी !

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button